राज्य सरकारने नुकतीच राज्य परिवहन महामंडळच्या बसेसमध्ये महिलांना तिकीट दरात पन्नास टक्के सूट देण्याची घोषणा केली. त्यानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये महिलांची गर्दी वाढल्याचे चित्र समाजमाध्यमावर दिसू लागले होते. त्यामुळे खासगी प्रवासी वाहनांमध्ये महिला प्रवाशांची संख्या रोडावली होती. याच धर्तीवर आता खासगी बसमध्ये सुध्दा महिलांना पन्नास टक्के सूट देण्याचा निर्णय गडचिरोली-चंद्रपूर ट्रॅव्हल्स असोसिशनकडून घेण्यात आला आहे. आज गुडीपाडवापासून नवे तिकीट दर लागू करण्यात आले आहे.
का घेतला निर्णय
शासनाने जाहीर केलेल्या सवलतीमुळे खासगी बसपेक्षा एसटी महामंडळाच्या बसमधून महिला प्रवास करु लागल्या. यामुळे खासगी ट्रव्हल्सला प्रवाशी मिळत नव्हते. त्यासंदर्भात गडचिरोली -चंद्रपूर ट्रॅव्हल्स असोसिशनच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. या बैठकीत गडचिरोली – चंद्रपूर मार्गावर खाजगी ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात पन्नास टक्के सूट देण्याचे जाहीर केले आहे. यामुळे आता खाजगी बसेसमध्ये सुध्दा महिला प्रवाशांची संख्या पूर्वपदावर येईल असा विश्वास चंद्रपूर-गडचिरोली ट्रॅव्हल्स सदस्य यांनी व्यक्त केला आहे. एसटी महामंडळाने बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांसाठी नियम तयार केले आहे. परंतु खासगी ट्रव्हल्सकडे असे काही नियम नाहीत.