एसटी बसच्या प्रवासात महिलांना सूट देण्याबरोबरच शिंदे-फडणवीस सरकारनं महिलांच्या आरोग्यावरही लक्ष केंद्रीत केलं आहे. कारण ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या अभियानाद्वारे महिलांसह मुलींची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार असून त्यात औषधोपचाराचाही समावेश करण्यात आला आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जेष्ठ नागरिकांना एसटी बसच्या प्रवासात संपूर्णपणे सूट देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला होता. त्यानंतर आता महिलांनाही एसटी बसच्या प्रवासात तब्बल ५० टक्क्यांची सूट देण्यात आल्यामुळं या निर्णयाचा महिला वर्गाला मोठा फायदा होणार आहे.